5 पेट्रोल पंप धारकांवर खटला…

Published:

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहीम पार पडली. या तपासणी दरम्यान ५७९ पेट्रोल पंपधारक व २५४ किरकोळ दूध विक्रेत्यांची तपासणी करून ५ पेट्रोल पंप धारकांवर पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणासाठी, तर २४ पेट्रोल पंप धारकांवर वजने मापे विहित मुदतीमध्ये पडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे खटले नोंदविण्यात आले. १७ पंप धारकांना वितरणात अनियमितता आढळून आल्याने संबंधित तपासणी अधिकाऱ्यांद्वारे परिशिष्ट १० प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या या त्रुटी सात दिवसांच्या आत पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले.

आवेष्टित दुधाबाबत एकूण २५४ आस्थापनांच्या तपासणी दरम्यान छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहीत) अधिक दराने विक्री करणाऱ्या ३१ आस्थापनांवर वरील अधिनियम व नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच सदर आस्थापनेद्वारा वापरात असलेले वजन व मापे विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे तसेच इतर उल्लंघनाबाबत ७२ खटले नोंदविण्यात आले.संपूर्ण मोहिमेत वैध मापन शास्त्र अधिनियम, २००९ तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ तसेच वैध मापन शास्त्र (आवेष्टित वस्तु) नियम, २०११ मधिल तरतुदींच्या उल्लंघनाबाबत एकूण १२५ खटले नोंदविण्यात आले.

पेट्रोल व डिझेलच्या वाढते दर तसेच दुधाच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ग्राहक हितार्थ नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, तथा अपर पोलिस महासंचालक, डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी – डॉ. रवींद्र कुमार सिंगल

ग्राहकांच्या हितार्थ ही मोहीम राबविण्यात आली असून व्यापाऱ्यांद्वारे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी कोणतीही वस्तू, वजन अथवा मापाने खरेदी करीत असताना ते कमी दिले जात नाही ना याची दक्षता घ्यावी. प्रमाणित वजन व मापानेच वस्तू खरेदी करावी.

आवेष्टित वस्तू छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहित) अधिक दराने विक्री करणे गुन्हा आहे. आवेष्टित वस्तूंवर वस्तूचे सामान्य नाव, उत्पादक/ आयतदार / आवेष्टक यांचे नाव व पत्ता, निव्वळ वजन/ माप, उत्पादित/ आवेष्टित / आयातीत केल्याचा महिना व वर्ष, किरकोळ विक्री किमत (सर्व करांसहीत). ग्राहक सेवा दूरध्वनी क्रमांक व ई-मेल इ. माहिती घोषित करणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, तशी तक्रार वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या https://www.vaidhmapan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करण्याचे आवाहन केलेले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page