Navi mumbai – नवी मुंबई ते सिंधुदुर्ग चिपी विमान सेवेचा आज शुभारंभ झाला. नवी मुंबईहून सिंधुदुर्गसाठी सुरू झालेलं फ्लाय-९१ कंपनीचं विमान चिपी विमानतळावर दाखल झालं. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या विमानसेवेचं जिल्हावासीयांनी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत केलं. पहिल्या विमानातून आलेल्या प्रवाशांचं पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आलं.

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या विमानातून प्रवास केला. आमदार नीलेश राणेही यावेळी उपस्थित होते. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे कोकणवासीय आणि पर्यटकांना कमी वेळेत सिंधुदुर्गला पोहोचता येणार आहे. या सेवेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


