ठाणेकरांनो पुढील 7 दिवस पाणी उकळून व गाळून प्या…

Published:

thane – बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2 च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, हा कप्पा बुधवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या सूचनेच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका प्रशासनानेही शहरातील संबंधित भागांतील नागरिकांना पाणी वापरताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ठाणे शहरातील काही भागांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे-पांजरापूर जलवाहिनीवरील जलजोडण्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी पुढील 7 दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे, असे महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हाजुरी, लुईसवाडी, काजुवाडी, जिजामाता नगर, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथनगर, रामचंद्र नगर क्रमांक 1, कोपरी-आनंदनगर, राम मारुती रोड, मासुंदा तलाव परिसर, जांभळी नाका, खारकर आळी, महागिरी, कोळीवाडा, पाटीलवाडी, बी-कॅबिन परिसर, टेकडी बंगला परिसर, भक्ती मंदिर रोड आणि पाचपाखाडी या भागांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरील जलजोडण्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या परिसरांतील नागरिकांनी पाणी व उकळून व गाळून प्यावे असे आवाहन ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page