Pune – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ चा ध्वजारोहण सोहळा आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाहतूक बदलांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी याविषयीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ (शनिवार) रोजी रद्द करण्यात आलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा आता गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतल्या जातील.
या परीक्षा आधी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि वेळेतच (पूर्व नियोजित वेळेप्रमाणे) पार पडतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


