मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ…

Published:

mumbai – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान ही नवीन दैनंदिन एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. उद्घाटनपर विशेष गाडी क्रमांक ०१००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.

या गाडीमध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असणार आहे.

कोकण क्षेत्रातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ही नवीन दैनंदिन सेवा महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page