डोंबिवली – चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी अटक केली. शिवा रिषीपाल तुसांबड आणि आकाश उर्फ वाणी हिरू राठोड अशी या दोघांची नावे आहेत.
फिर्यादी देवेंद्र राजभर डोंबिवली पूर्व येथील शंकर मंदिराच्या बाजूला, शेलार नाका येथे पाणीपुरी खात असताना शिवा तुसांबड, छोटया चंदया, मोठया चंदया आणि वाणी या चौघांनी मिळून फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून, दमदाटी करून त्यांच्या जवळील १८,२०० /- रूपये रोख रक्कम जबरीने काढून घेतले असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३९७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्वेतील बंदिश पॅलेस हॉटेल जवळ सापळा रचून शिवा तुसांबड आणि आकाश उर्फ वाणी हिरू राठोड या दोघांना अटक केली. दरम्यान, शिवा तुसांबड याच्याविरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात ७ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात १ असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक – ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोउपनिरी नवनाथ कवडे, पोहवा अनुप कामत, पोहवा बालाजी शिंदे, पो.हवा. बापूराव जाधव, पोहवा विलास कडु, पोना सचिन वानखेडे, पोशि गोरक्ष शेकडे यांनी केली.