वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश…

Published:

mumbai – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभाग दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाई दरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्वच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर दुसऱ्या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.

कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page