assam – भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वायू दलाच्या ‘एएन-३२’ हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट येथे कोसळलं. या अपघातामध्ये भारतीय हवाई दलाच्या पायलटसह ५ जवान शहीद झाले असून, सह-वैमानिक बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील मोहिम संपवून हे विमान नियमित उड्डाणांतर्गत जोरहाट एअरबेसवर दाखल होत होते. मात्र लँडिंगवेळी हा भीषण अपघात झाला.या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये विमान कोसळल्यानंतर त्याचे दोन तुकडे होताना आणि त्यानंतर त्याला आग लागताना दिसत आहे.
भारतीय हवाई दलाकडून याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आसाममधील जोरहाट येथे झालेल्या एएन-३२ विमान अपघातात पाच जवानांच्या निधनाने भारतीय हवाई दल अत्यंत दुःखी आहे. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअर खेमाराम कुमावत आणि अग्निवीर एअर दानिश आलम यांनी कर्तव्य बजावत असताना सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबियांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त करते. या दुःखाच्या प्रसंगी हवाई दल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.


