एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात वाढ…

Published:

mumbai – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली.

बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन केले.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page