thane – घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ८ मे ते १० मे २०२६ दरम्यान मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली आहे. या संदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे.
मुल्लाबाग बस डेपो जवळील फुटओव्हर ब्रिजवर आरपीएस-पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम होणार आहे. हे काम ८ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून ९ मे रात्री ११.५५ वाजेपर्यंत आणि त्यानंतर ९ मे रात्री ११.५५ ते १० मे सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा-ब्रह्मांड सिग्नलमार्गे कापुरबावडीकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. तसेच एमजी मोटर्स शोरूम, मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही ब्रिज चढणीवर प्रवेश दिला जाणार नाही.
वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गही जाहीर केले आहेत. कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रह्मांड सिग्नलवरून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा चौक आणि कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे प्रवास करावा. तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिजलगतच्या स्लिप रोडने नागोरी टी स्टॉलजवळून डावीकडे वळून टिकुजीनी वाडी सर्कल आणि मुल्लाबाग कटमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना शक्यतो या मार्गावरील प्रवास टाळण्याचे आणि विशेषतः जड-अवजड वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


