thane – मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी असे याचे नाव आहे. परंतु पोलीस आरोपीला ताब्यात घेत होते त्यावेळी आरोपीने बंदुकीतून ५ गोळ्या झाडल्या आणि त्या दोन नागरिकांना लागल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौसा परिसरात बाबा खान हे राहतात. शनिवारी पहाटे च्या सुमारास त्यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आचार गल्ली येथे शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने पोलिसांच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले दोन नागरिक जखमी झाले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक बंदूक चार मॅगझिन जप्त केल्या आहेत.


