mumbai – बारामती विमान दुर्घटनेनंतर Directorate General of Civil Aviation (DGCA) ने मोठी कारवाई केली आहे. अपघातग्रस्त विमान हे VSR Ventures कंपनीचं असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीच्या चार लिअरजेट विमानांची उड्डाणं तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२८ जानेवारीला झालेल्या बारामती अपघातानंतर कंपनीच्या विमानांचं विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं. या तपासणीत विमान देखभाल पद्धती, उड्डाण सुरक्षा आणि तांत्रिक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्याचं DGCAनं म्हटलं आहे. जोपर्यंत कंपनी त्रुटींचं मूळ कारण शोधून दुरुस्त करत नाही आणि सुरक्षेचे निकष पूर्ण करत नाही, तोपर्यंत उड्डाणास परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर्ससोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर DGCAने नवीन कडक सुरक्षा आदेश जाहीर केले आहेत. सुरक्षेला व्यावसायिक बाबींवर प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले असून, पायलट-इन-कमांडचा निर्णय अंतिम असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. नव्या नियमांनुसार विमानाचं वय, देखभाल इतिहास आणि वैमानिकांचा अनुभव यासारखी माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक असेल. तसेच DGCA सुरक्षा मानांकन जाहीर करणार असून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डेटा तपासणी अधिक कडक केली जाणार आहे. निष्काळजीपणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असून परवाना निलंबनासह कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून विशेष सुरक्षा तपासणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.


