kalyan – 4/जे प्रभागात उभारण्यात आलेल्या आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशिक्षण केंद्राचा लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना चांगला फायदा होईल, असे उद्गार महापौर हर्षाली चौधरी यांनी काढले. महापालिकेच्या 4/जे प्रभाग कार्यालयात नव्याने उभारलेल्या आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समयी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.
यासमयी आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे वित्त अधिकारी देवर्षी पंडा, नाशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक जीवन सोनावणे आणि कल्याणचे केंद्राचे प्रादेशिक संचालक मारुती खोडके तसेच महापालिकेचे पालिका सदस्य, सदस्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रशिक्षण केंद्रे मुंबई आणि नवी मुंबईत उपलब्ध आहेत, तथापि वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन विभागीय प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता होती आणि आता हे कल्याणचे प्रशिक्षण केंद्र सर्व विभागांना चांगल्या रितीने प्रशिक्षण देवू शकेल, असे उद्गार आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांनी यावेळी बोलताना काढले.
महाराष्ट्रातील आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे 9वे प्रशिक्षण केंद्र कल्याणमध्ये महापालिकेच्या 4/जे प्रभाग कार्यालयात उभे राहिले असून, त्याचा फायदा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील तसेच नजीकच्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे होईल, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना काढले.

तर, चांगल्या कामासाठी महानगरपालिकेने ही जागा उपलब्ध करुन दिली आहे. आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने या जागेचा चांगला सदुपयोग करावा. चांगल्या एनजीओंसाठी महापालिकेने कायम मदत करावी, लोकप्रतिनिधींनीही अशा गोष्टींसाठी कायम सहकार्य करतील, असे उद्गार उपमहापौर राहुल दामले यांनी यावेळी बोलताना काढले.
महापालिकेच्या 4/जे प्रभाग कार्यालयात आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रासाठी 554 चौ.मी. इतकी प्रशस्त जागा महापालिकेने उपलब्ध करुन दिली असून, सदर जागेमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एलएसजीडी, एलजीएस, एसआय, डीएलजीएफएम इ. बाबतचे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल, अशी माहिती कल्याण प्रशिक्षण केंद्राचे संचालक मारुती खोडके यांनी दिली.


