thane – ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष बळीराम तेटवार याला कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहन चालक सतीष बळीराम टेटवार तसेच खाजगी वाहन चालक विपुल भरत बनकर हे कार्यालयीन वेळेत कारमध्ये मद्यप्राशन करत असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही वाहनचालकांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
सदर प्रकार अत्यंत गंभीर मानून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अन्वये सतीष बळीराम टेटवार या वाहन चालकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर विपुल भरत बनकर हा खाजगी वाहन चालक असल्याने त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास कळविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


