एसटीच्या ताफ्यात लवकरच राजमाता जिजाऊ बस…

Published:

mumbai – शिवशाही, शिवनेरीनंतर आता एसटीची राजमाता जिजाऊ बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही नवीन बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये यासाठी 3 बाय 2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी नव्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे.

सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. यामुळे अतिगर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या अतिरिक्त १५ प्रवाशांना आता बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.

या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतील. या बस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यापासून प्रवाशांना या नवीन आणि आरामदायी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page