मुंबई – ७६ किलो गांजासह चार जणांना गुन्हे शाखा कक्ष ७ पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जाहीद मोहरमअली शेख, संदीप कुमार महेश बाबु निषाद, सुर्या विनोद रॉय आणि व्यंकटेश पेरमाल अशी या चौघांची नावे आहेत.
काही इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दादर रेल्वे स्टेशच्या बाहेर, दादर पूर्व मुंबई येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, हे इसम विमानाने ओडीशा राज्यात जाऊन परत येताना नेहमी ट्रेनने गांजा आणून मुंबई शहरात विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दादर पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर सापळा रचून सदर ४ जणांना एकूण ७६ किलो ४५५ कि.ग्रॅ. वजनाच्या (अंदाजे किंमत रु. ३०,५८,२००/-) गांजासह ताब्यात घेतले. तसेच सदरबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर चौघांना अटक केली आणि गांजा जप्त केला.