navi mumbai – वरिष्ठ पोलीस निरीक्षकास साडेतीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सतीश कदम असे यांचे नाव असून, ते नवी मुंबईतील एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
फसवणुकीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताबा न घेण्याकरीता व अटक न करण्याकरीता तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता सतीश कदम यांनी ५,००,०००/- (पाच लाख रुपये) रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ लाखांची लाच घेण्याचं मान्य केलं होतं.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांच्या वडीलांविरुद्ध एन आर आय सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी इमारत पडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये ते सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत नमूद गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता व जामीन मिळवून देण्याकरीता सतीश कदम यांनी प्रथम १२ लाख व त्यानंतर २ लाख अशी रक्कमेची मागणी करून ती तक्रारदार यांचेकडून स्वीकारली.
त्यानंतर तक्रारदार यांच्या वडीलांवर पुन्हा एन आर आय सागरी पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात ताबा न घेण्याकरीता व अटक न करण्याकरीता तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता रुपये ५ लाख रक्कमेची मागणी केली.
सदरबाबत एसीबीकडून पडताळणी करण्यात आली असता पडताळणीमध्ये सतीश कदम यांनी तडजोडीअंती रुपये ४,००,०००/- रक्कमेची मागणी करून सदरची रक्कम त्याचदिवशी रात्री ते राहत असलेल्या इमारती जवळ आणून देण्याचे सांगितले त्यानुषंगाने एसीबीने सापळा रचून सतीश कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन आर आय सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई यांना ते रहात असलेल्या नवी मुंबई येथील इमारतीखाली लाचेची रक्कम रुपये ३,५०,०००/- घेताना रंगेहात पकडले.