उल्हासनगर – वाईन शॉपमधील दारू व वाईन चोरी करून विक्री करणा-या नोकरासह त्याच्या साथीदारांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुनिल कुंदल, सुरेश पाचरने, नरेश भोईर, सागर पाटील अशी या चौघांची नावे आहेत.
गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलीस कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पो.शि. गोरक्ष शेकडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सुनिल कुंदल याला उल्हासनगर येथून सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याचे ३ साथीदार सुरेश पाचरने, नरेश भोईर, सागर पाटील या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी दारूच्या सिलबंद बाटल्या,रोख रक्कम असा एकूण २१,६५५/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच या चौघांना पुढील तपासकामी कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पावर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.दत्ताराम भोसले, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, बालाजी शिंदे, विलास कडू, गुरुनाथ जरग, चालक – अमोल बोरकर यांनी केली आहे.