ठाणे – कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2023- 2024 चा सुधारित 5988 कोटी 09लक्ष रूपयांचा तर सन 2024-2025 सालचा 5025 कोटी 01 लक्ष रूपयांचा मूळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करीत मंजूर केला.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या त्रिसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, भांडवली कामातंर्गत घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, कामांचा दर्जा उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
सन 2023-24 मध्ये रु. 4370 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणीपुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहिरात, स्थावर मालमत्ता इत्यादी विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसूली उत्पन्न रु. 3160 कोटी 16 लक्ष ऐवजी रु 3092 कोटी 39 लक्ष सुधारित करण्यात आले आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. 460 कोटी 05 लक्ष अनुदानामध्ये रु. 697 कोटी 98 लक्ष वाढ होत असून सुधारित अर्थसंकल्पात अनुदानापोटी रु. 1158 कोटी 03 लक्ष अनुदान अपेक्षित केले आहे व डिसेंबर 2023 अखेर रु. 898 कोटी 29 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातील अखर्चित रकमा 2023-24 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. खर्च बाजूस सन 2023-24 मध्ये महसुली खर्च रु. 2708 कोटी 83 लक्ष अपेक्षित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु. 2672 कोटी 79 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु. 1660 कोटी 91 लक्ष ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो रु. 2049 कोटी 43 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत
1) मालमत्ता कर :
मालमत्ता कर व फी पासून सन 2023-24 मध्ये रु. 761 कोटी 72 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर 2023 अखेरचे उत्पन्न रु.481 कोटी 36 लक्ष विचारात घेवून मालमत्ता करापासून रु.738 कोटी 71 लक्ष सुधारित अंदाज करण्यात येत आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके दि.01 एप्रिल 2023 च्या पहाटे जनरेट करुन करदात्यांना देयके व कर भरण्याच्या लिंकसह एसएमएसद्वारे पाठविण्यात आली. महानगरपालिकेकडून प्रथमच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसच मालमत्ता कराची देयके देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. दि.01 एप्रिल2023 रोजी पहिल्या दिवशी रु.1.93 कोटी तर एप्रिल 2023 महिन्यात रु.65.79 कोटी इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत / सूट देण्यात आली आहे. सन 2023-24 मध्ये उपरोक्त सवलतीचा 2,60,937 इतक्या करदात्यांनी लाभ घेतला आहे. करदात्यांना त्यांच्या करावरील कराधान नियम 41 (1) अन्वये आकारलेल्या मालमत्ता करावरील शास्ती / व्याज माफीची अभय योजना यशस्वीपणे राबविली असून 59,456 करदात्यांनी याचा लाभ घेतला असून सदर अभय योजनेमुळे रु.164 कोटी 37 लक्ष एवढी वसुली झालेली आहे. सन 2024-25 मध्ये मालमत्ता कर व फीसह रु.819 कोटी 71 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वर्षाच्या अगदी सुरुवातीस देण्यात येणार आहेत. जेणेकरून, महापालिकेस आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस कररुपी उत्पन्न मिळेल.
ठाणे महानगरपालिकेच्या कर वसुली विभागांतर्गत मालमत्ता कराच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याकरीता पुढीलप्रमाणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. 1) वाढीव मागणी व त्यातून वाढणा-या उत्पन्नातील भागिदारी तत्वावर मालमत्तांचा जी.आय.एस.सर्व्हे व त्यातून उत्पन्न वाढ. 2) मालमत्ता कराचा डेटा हा इतर विभागाच्या डेटा सोबत तुलनात्मक पुनर्पडताळणी करणे (Data Analytics)प्रस्तावित असून यावरून मालमत्ता कराचा डेटा सुधारित होवून मालमत्ता कराच्या मागणीमध्ये वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
2) विकास व तत्सम शुल्क :
सन 2023-24 मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी रु.565 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. यामध्ये या आर्थिक वर्षात चांगली वाढ झाली असून शहर विकास विभागाकडून प्राप्त झालेले डिसेंबर 2023 अखेरचे उत्पन्न रक्कम रु.554 कोटी 51 लक्ष विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रक्कम रु.662 कोटी 86 लक्ष सुधारित करण्यात आले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात रु.750 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहे.
3) स्थानिक संस्था कर :
स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु.1057 कोटी 79 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.200 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु. 10 कोटी असे एकूण रु.1267 कोटी 79 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत असून डिसेंबर 23 अखेर प्रत्यक्षात रु.793 कोटी 35 लक्ष प्राप्त झाले आहेत. परंतु मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अपेक्षित धरलेल्या अनुदानापैकी आतापर्यंत रु.86 कोटी 51 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने मुद्रांक शुल्कापोटी सुधारित अंदाज रु.175 कोटी अपेक्षित केले आहे. तसेच स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकी वसुलीपोटी अपेक्षित उत्पन्नापैकी डिसेंबर 2023 अखेर रु. 9 कोटी 58 लक्ष प्राप्त झाले असल्याने सुधारित अंदाज रु. 11 कोटी 11 लक्ष करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज एकूण रु.1243 कोटी 90 लक्ष अपेक्षित केले आहेत. तसेच सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु. 1142 कोटी 42 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु. 200 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु. 8 कोटी असे एकूण रु.1350 कोटी 42 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
4) पाणी पुरवठा आकार :
पाणी पुरवठा आकारासाठी सन 2023-24 मध्ये रु. 225 कोटी उत्पन्न अपेक्षित होते.यामध्ये मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. पाणी पुरवठा आकाराचे डिसेंबर 2023 अखेर प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न रु.63 कोटी 76 लक्ष विचारात घेता सुधारित अंदाज रु. 150 कोटी अपेक्षित केले असून सन 2024-25 मध्ये रु. 225कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
5) अग्निशमन दल :
अग्निशमन विभागाकडून मूळ अंदाज रु. 132 कोटी 03 लक्ष अपेक्षित केले होते. शासनाने फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस व फायर प्रिमियम चार्जेस बंद करुन अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी सुरु करण्यात आली असून डिसेंबर 2023 अखेर प्रत्यक्ष रु. 73 कोटी 84 लक्ष प्राप्त झाले असून उत्पन्नामध्ये घट झाली असल्याने रु.100कोटी सुधारित अंदाज प्रस्तावित केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रु. 100कोटी 03 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.
6) स्थावर मालमत्ता विभाग :
सन 2023-24 या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.19 कोटी 65 लक्ष अपेक्षित केले होते. डिसेंबर 2023 अखेर रु.5 कोटी 80 लक्ष प्रत्यक्षात उत्पन्न प्राप्त झाले असल्याने स्थावर मालमत्ता विभागाचे सुधारित अंदाज रु. 14 कोटी 78 लक्ष अपेक्षित केले आहे. सन 2024-25 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.12 कोटी 15 लक्ष उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.
7) जाहिरात फी :
जाहिरात फी पोटी सन 2023-24 मध्ये रु. 22 कोटी 37 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. डिसेंबर 2023 अखेर प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न रु. 8 कोटी 47 लक्ष झाले असल्याने सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फी पासून रु.12कोटी 35 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले असून सन 2024-25 मध्ये रु. 24 कोटी 62 लक्ष उत्पन्न अंदाजित केले आहे.
8) अनुदाने :
सन 2023-24 मध्ये शासनाकडून डिसेंबर 2023 अखेर रु.989कोटी 29 लक्ष लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधांतर्गत रस्ते विकसन रु. 219 कोटी 65 लक्ष , दिवा मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा (रिमॉडेलिंग) व जलकुंभ बांधणे साठी रु.240कोटी 29 लक्ष, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नुतनीकरणापोटी रु.25कोटी ,शहर सौंदर्यीकरणासाठी रु. 35 कोटी, पंधराव्या वित्त आयोगाकडून रु. 52 कोटी 81 लक्ष व पायाभुत सुविधांतर्गत विशेष अनुदानापोटी रु. 314 कोटी 55 लक्ष, अल्पसंख्यांक बहुल विकास निधी पोटी रु. 3 कोटी , MMRDA कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत रु. 8 कोटी 30 लक्ष ही अतिरिक्त अनुदाने प्राप्त झाल्याने अंदाजपत्रकात रु. 1158 कोटी 03 लक्ष सुधारित उत्पन्न अपेक्षित केले आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रु.284 कोटी 32 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नुतनीकरण व सुधारणा रु.10 कोटी, एकात्मिक उदयान विकास कार्यक्रम रु.10 कोटी, एकात्मिक स्मशानभुमी नुतनीकरण कार्यक्रम रु.10कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नुतनीकरण रु.35कोटी, पंधरावा वित्त आयोग रु. 5 कोटी, पायाभुत सुविधेसाठी रु.50 कोटी, MMRDA कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत रु.5 कोटी, अमृत योजना फेज 2 साठी रु.10 कोटी व एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरण कार्यक्रमांतर्गत रु.10 कोटी, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील 6 तलावांचे संवर्धनासाठी रु.10 कोटी 62 लक्ष व कोलशेत बसडेपो विकसित करणेसाठी रु.10 कोटी इत्यादींचा समावेश आहे.
9) म्युनिसिपल बॉन्ड अथवा कर्ज :
आजमितीस महापालिकेवर रु. 93 कोटी 62 लक्ष कर्ज शिल्लक आहे. केंद्र शासनाने अमृत 2 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारासाठी रु.323 कोटी रकमेचा डि.पी.आर. मंजूर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा 25%, राज्य शासनाचा 25% व महापालिकेचा 50% हिस्सा असणार आहे. महापालिका हिस्स्याची रक्कम म्युनिसिपल बॉन्ड उभारुन किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानापैकी मार्च 2023 अखेर अखर्चित निधी दि.1.4.2023 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट आहे. सन 2023-24 मध्ये केंद्र व राज्य शासनाकडील प्राप्त निधीमधून हाती घेतलेली कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2023-24 मध्ये शिल्लक राहणारी अंदाजित अखर्चित रक्कम सन 2024-25 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
10) कुष्ठरोग रुग्णांसाठी मोफत औषधे :
बहुतांश कुष्ठरोग बाधीत रुग्ण हे आर्थिक दुर्बल घटकातील असून त्यांना विशिष्ठ औषधांची गरज असते. महापालिका हद्दीतील कुष्ठरोग रुग्णांसाठी मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात कुष्ठरोग औषधे खरेदी या लेखाशीर्षांतर्गत आवश्यकती तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
11) मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटलचे विस्तारीकरण:
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा विस्तारीत भाग म्हणून श्रीनगर, वागळे इस्टेट येथे मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल पी.पी.पी. तत्वावर सुरु करण्यात आले आहे. सदरचे रुग्णालय सुपर स्पेशालिटी सुविधा कॅशलेस असणारे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय आहे. सदर रुग्णालयात Cardiac, Cardiothoracic, Neurology, Plastic Surgery, Surgical oncology , Gastroenterology इत्यादी प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. रुग्णालय सुरु झाल्यापासून मागील एक ते दिड वर्षात 6 हजार पेक्षा जास्त रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतले असून हे सर्व उपचार महात्मा फुले जन आरोग्य या योजनेमधून मोफत घेतले आहेत.
या रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या पाहता, क्षमता वाढविण्यासाठी विस्तारीकरणाची आवश्यकता होती. यासाठी शासनाकडून रु.20 कोटी अनुदान प्राप्त झाले असून रुग्णालयाच्या शेजारची जागा संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
12) मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल नळपाडा:
मौजे नळपाडा येथे 100 खाटांचे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलकरीता साहित्य खरेदीसाठी पायाभुत सुविधेंतर्गत शासनाकडून रक्कम रु.7 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर हॉस्पिटल पी.पी.पी.च्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
13) कौसा हॉस्पीटल कार्यान्वित करणे व कर्करोग उपचार सुविधा निर्माण करणे:
कौसा येथील 150 खाटांचे स्वांतत्र्य सैनिक हकीम अजमल खान हे रुग्णालय महापालिकेमार्फत पी.पी.पी. तत्वावर चालविणेबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत. सदर रुग्णालयामध्ये “महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना” अंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिका धारण करणाऱ्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात “महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना” या मध्ये अपात्र ठरणा-या रुग्णांच्या उपचारापोटी येणारा खर्च महापालिकेमार्फत अदा केला जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सदर रुग्णालयात कर्करोगग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा व उपचार (Doctor Consultation, Screening test-Biopsy, MRI, PET CT Scan, Radiation, Surgery) मोफत पुरविले जाणार आहेत. कर्करोगाचे उपचार मोफत उपलब्ध करुन देणारी ठाणे महापालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.
14) डायलिसिस केंद्र
ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरु आहेत.
1. सी.आर वाडिया आरोग्य केंद्र
2. रोजा गार्डन प्रसूती गृह
3. निर्मलादेवी दिघे कोरस रुग्णालय
4. काशिनाथ घाणेकर डायलिसिस केंद्र
5. कौसा रुग्णालय येथील दहा खाटांचे डायलिसिस केंद्र
कोपरी गाव येथील आरोग्य केंद्रामध्ये पी.पी.पी. तत्त्वावर डायलिसिस केंद्र मे. नाना पालकर स्मृती समिती या संस्थेद्वारे चालविण्यात येत आहे. डायलिसिस केंद्राकरिता आवश्यक असणारी उपकरणे डायलिसिस मशीन संस्थेमार्फत बसविण्यात येणार आहेत.
वागळे प्रभाग समिती अंतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे प्रसुतीगृह येथे पी.पी.पी.च्या माध्यमातून डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.
15) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय अदययावतीकरण :
1) ठाणे शहराव्यतिरिक्त ठाणे जिल्यातील कल्याण, मुरबाड ,शहापूर , भिवंडी इत्यादी ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल होत असतात. या बाबींचा विचार करुन मा.मुख्यमंत्री महोदयांनी रुग्णालयाच्या अªयावतीकरणासाठी रु.60 कोटी एवढे शासन अनुदान मंजूर केले आहे. सदर अनुदानातून रुग्णालयाच्या अªयावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून सन 2024-25 मध्ये ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
2) राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयामध्ये पदव्युत्तर (MD/MS) अभ्यासक्रम करणारे विदयार्थी हे त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करत असताना रुग्णालयातील बहुतांश वैदयकीय सेवा देतात. वैदयकीय महाविदयालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील रुग्णांची वैदयकीय सेवा ही त्यांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणारी हिच मुले करतात. सबब, महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या दर्जाचे डॉक्टर्स व त्यांची सेवा उपलब्ध व्हावी तसेच या विदयार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
3) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील साफसफाईचा दर्जा सुधारण्यासाठी मनुष्यबळ वाढवून यांत्रिकी पद्धतीने साफसफाई सुरू केलेली असून रुग्णालयाच्या साफसफाई मध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे.
4) रुग्णालयातील Occupancy ही १००% हून अधिक होत असल्याकारणाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय यांचेकडे आवश्यक मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असून यामध्ये 173 परिचारिका, 63 अधिव्याख्याता, अटेंडन्ट 21 व इतर 12 अशी एकूण 269 कंत्राटी पदे भरण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त इतर 405 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु असून मुलाखती संपन्न झाल्या आहेत व नियुक्ती आदेश सत्वर निर्गमित केले जातील.
5) राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाचे नूतनीकरण पूर्ण झालेले असून अत्याधुनिक असे वसतिगृह त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
16) मोफत दहनविधी सुविधा :
एखादया व्यक्तीचे निधन झाल्यावर दहनविधीसाठी येणारा खर्च , अशा दु:खद समयी कुटुंबीयांच्या दु:खात भार टाकणारा असतो. अंत्यविधीचा खर्च हा सामान्य कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकणारा असतो. याचा विचार करुन ठाणे महानगरपालिकेने सर्व प्रकारचे दहन विधी मोफत देणेचे ठरविले आहे. यासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात ” मोफत दहनविधी सेवा” या लेखाशीर्षांतर्गत रु.2 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
17) इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरु करणे :
शांतीनगर येथे नवीन शाळेचे बांधकाम सुरु असून तेथे व हाजुरी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सन 2024-25 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. तसेच DMART या संस्थेमार्फत सध्या 3 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु असुन त्यांचेमार्फत आणखी नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणेबाबत प्रयत्न सुरु आहेत.
18) मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण :
मराठी माध्यमाच्या शाळांच्या सक्षमीकरणांतर्गत शासनाकडून रु. 3 कोटी अनुदान मंजूर झाले असून त्यामधून महापालिकेच्या एकूण 60 शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटीक कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा बनविण्यात येणार आहे.
1) माझी शाळा सुंदर शाळा :
माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमांतर्गत कृती आराखडा बनविण्यात आला असून त्यानुसार शाळा दुरुस्ती करण्यात येणार आहे.
Ø शाळा दुरुस्ती करतांना मुलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असून त्यामध्ये कोणत्याही शाळेत गळती असू नये व शौचालय उत्तम दर्जाचे असेल याबाबत दक्षता घेतली जाईल. महापालिकेच्या बालवाडयांच्या भिंतींना आकर्षक रंगरंगोटी करुन बोलक्या भिंती उपक्रम राबविण्यात येणार आहे. लहान मुलांना आकर्षित करणारी खेळणी साहित्य पुरवठा करुन बालस्नेही बालवाडया तयार करण्यात येणार आहेत.
Ø ठाणे महानगरपालिकेच्या 10 शाळा या सर्वार्थाने आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी व 9 वी च्या वर्गातील 34 विदयार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो) येथे वैज्ञानिक सहल घडवून आणली. या सहलीमध्ये विदयार्थ्यांनी इस्त्रोचे म्युझियम, इस्त्रोच्या रॉकेट लॉचिंग या ठिकाणांची माहिती घेतली. या उपक्रमातील विदयार्थ्यांचे अनुभव हस्तपुस्तिकेत लिखित करण्याचे काम सुरु आहे. सन 2024-25 मध्ये देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
Ø विज्ञान मंच या उपक्रमामध्ये पथनाटय स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नेहरु सायन्स सेंटर व नेहरु तारांगण येथे 500 विदयार्थ्यांना शैक्षणिक भेट, खोडद येथे 40 विदयार्थ्यांना जगातील सर्वात मोठी दुर्बिण सफर सहल आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे सन 2024-25 मध्ये देखील अशाप्रकारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
Ø ठाणे महापालिकेच्या सर्व शाळांची 8 गटात विभागणी असून प्रत्येक गटामध्ये संगणक प्रयोग शाळा/ MATHS प्रयोगशाळा/ सायन्स प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विदयार्थ्यांच्या विविध योजनांसाठी रु.32 कोटी 25लक्ष, महापालिका शाळा मजबुतीकरणासाठी रु.8 कोटी व शाळा बांधकामासाठी रु. 4 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
19) “चला वाचू या ” उपक्रम :
19.1) शाळेतील वाचन कोपरा :
विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विदयार्थ्यांच्या वयानुरुप आणि अपेक्षित विषयानुरुप पुस्तके खरेदी करुन ठाणे महापालिकेच्या सर्व शाळांमधील इयत्ता 5 वी ते 10 वी या प्रत्येक वर्गात वाचन कोपरा निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. तसेच विदयार्थ्यांना वाचनासोबतच लिखाणाची सवय व्हावी यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाचे जे संचित विदयार्थ्यांना मिळेल याची नोंद पासबुक मध्ये त्यांनी स्वत: करावयाची आहे. यासाठी नोंदी ठेवण्यासाठी पासबुक देण्यात येणार असून त्यात त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबाबत अभिप्राय लिहिणे शक्य होईल. यासाठी शाळांमध्ये वाचनालय/ अभ्यासिका या लेखाशीर्षांतर्गत रु. 50 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.
19.2) निसर्ग वाचनालय :
निसर्गाच्या कुशीत, झाडांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासण्याकरीता ठाणेकरांसाठी ही सुखद संधी ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिली असून महापालिकेच्या काही उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरूवात करण्यात आली आहे. या वाचनालयात उद्यान विषयक, झाडे आणि प्राणी यांचे महत्त्व सांगणारी पुस्तके, विविध कादंबऱ्या, प्रवासवर्णने, कविता संग्रह, बालसाहित्य उपलब्ध आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, तसेच, ज्यांना वाचनाची गोडी आहे त्यांना वाचनानंद मिळावा आणि त्यातून वाचन संस्कृती वाढीस लागावी, असा या उपक्रमाचा उद्देश असून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व उदयानांमध्ये निसर्ग वाचनालय सुरु करण्याचा मानस आहे. यासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात ” निसर्ग वाचनालय ” या लेखाशीर्षांतर्गत रु.50 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
19.3) मुख्यालयात वाचनालय :
ठाणे महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयातील प्रतिक्षाकक्षात प्रतिक्षा करणारे अभ्यागत यांना उपलब्ध असलेल्या वेळेत पुस्तकांची ओळख व्हावी, वाचनाची गोडी लागावी तसेच वाचन प्रेमींचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी ” चला वाचू या” या उपक्रमांतर्गत हे वाचनालय सुरु करण्यात आले असून नामांकित लेखकांची पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
19.4) ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय :
ठाणे शहराला थोर ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा आहे. शहराचा लौकिक वाढविणाऱ्या अनेक संस्था, ग्रंथालये आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. सदर ग्रंथालय हे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार असून त्यामध्ये ई बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्रे , लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचे स्वरूप असेल. सदरचे ग्रंथालय साधारणपणे 33000 चौ.फूट एवढे प्रशस्त असणार आहे. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असे मध्यवर्ती ग्रंथालय उभे राहील. सदर ग्रंथालयाचे नाव “मा.नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय” ठेवण्याचे नियोजित आहे. सदर ग्रंथालय हे विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या माध्यमातून विनामूल्य विकसित करण्यात येणार आहे. सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात ” ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय” या लेखाशीर्षांतर्गत रु.1 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
19.5) झोपडपट्टी तिथे वाचनालय :
गोरगरीब नागरिकांना देखील वाचनाची आवड असूनही त्यांना पुस्तके विकत घेऊन वाचणे परवडत नाही. यासाठी ठाणे शहरातील झोपडपट्टी विभागात ‘झोपडपट्टी तेथे वाचनालय’ सुरू करण्याचे ठरविले आहे. झोपडपट्टी परिसरात एक जागा निश्चित करून त्या ठिकाणी नागरिकांना वाचायला आवडतील अशी विविध विषयांवरील पुस्तके तसेच वर्तमान पत्रे ठेवली जाणार आहेत, जेणेकरून झोपडपट्टी विभागात राहत असलेल्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना पुस्तके वाचायची सवय होईल व त्या माध्यमातून त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल हा या मागील हेतू आहे. सदर उपक्रमातील पहिले वाचनालय कोपरी येथे लवकरच सुरु होईल. पुढील वर्षी अजून 10 ठिकाणी झोपडपट्टी तेथे वाचनालय सुरु करण्याचा मानस आहे. यासाठी सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात ” झोपडपट्टी तेथे वाचनालय ” या लेखाशीर्षांतर्गत रु. 1 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
20 ) हरित ठाणे उपक्रम :
एकात्मिक उदयान विकास कार्यक्रम :
शासनाकडून पायाभूत सुविधेंतर्गत रु.75 कोटी निधी मंजूर झाला असून ठाणे शहरातील सर्व उदयानांचा विकास एकात्मिक उदयान विकास आराखडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
शहरी वनीकरण योजना (Urban Forest) व बांबू लागवड :
Ø जपानी उद्यान तज्ञ मियावाकी यांच्या शहरी वनीकरण (Urban Forest) या संकल्पनेवर आधारित पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व लक्षात घेता शहरातील मोकळ्या तसेच आरक्षित भुखंडावर जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करुन शहरी वनीकरण (Urban Forest) सी.एस.आर. (CSR) निधीमधून करण्याचे नियोजित आहे.
Ø सदर वनांची निर्मिती व 3 वर्षांची देखभाल सी.एस.आर. निधीमधून केली जाणार आहे.
Ø शहरातील मियावाकी जंगलाची निर्मिती ग्रीन यात्रा या सेवाभावी संस्थेमार्फत कोणताही मोबदला न घेता करण्यात येत आहे.
Ø शहरी वनीकरण योजनेत या आर्थिक वर्षात 1,38,300 रोपांची लागवड करण्यात आली आहे.
संवाद आपल्या वृक्षांशी (हेरिटेज ट्री ट्रेल ) :
ठाणे शहरातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ठाणे शहरातील हेरिटेज ट्री (50 वर्षांवरील) व दुर्मिळ वृक्ष यांची माहिती व्हावी तसेच झाडांचे मानवीय जीवनातील महत्व पटवून देण्यासाठी दर रविवारी हेरिटेज ट्री ट्रेल आयोजित करण्यात येणार आहे. सदर ट्रेलसाठी एकूण 10 ठिकाणांवरील 23 झाडे निवडली आहेत.
सदर उपक्रमांतर्गत दर रविवारी ठाणे महानगरपालिका भवन येथून इलेक्ट्रीक वातानु कुलित बसमधून ही ट्रेल सुरु होईल व ठरलेल्या ठिकाणांवरील झाडांची माहिती गाईड मार्फत सांगण्यात येईल तसेच नागरिकांचे काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे सुध्दा देण्यात येतील. सदर उपक्रम हा अंदाजे 2 तासाचा राहील.
हेरिटेज ट्री ट्रेल ही महापालिका शाळेतील मुलांना मोफत असून इतर नागरिकांना सशुल्क उपलब्ध करुन दिली जाईल.
बोलकी झाडे (Speaking Tree) :-
सदर उपक्रमांतर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती मधील नव्याने विकसित करण्यात आलेले कोलशेत रोड येथील नमो सेंट्रल पार्क येथे एकूण 10 हेरिटेज व दुर्मिळ झाडांवर क्यु आर कोड लावण्यात आले आहेत. सदर क्यु आर कोड स्मार्ट फोनद्वारे स्कॅन केल्यानंतर त्या झाडाचा व्हिडिओ ओपन होईल व ते झाड जणू प्रत्यक्षात आपल्याशीच बोलत आहे अशी अनुभूती नागरीकांना अनुभवता येईल. सदर उपक्रम हा प्रायोगिक तत्वावर करण्यात आला असून लोकांचा प्रतिसाद पाहून इतर उद्यानांमध्ये राबविण्यात येईल.
ट्री क्यु आर कोड (Tree QR Code) :-
उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक झाड व वनस्पतीचे नाव किंवा त्याविषयी पूर्ण माहिती असतेच असे नाही. सदर बाब लक्षात घेता उद्यानातील प्रत्येक झाडावर क्यु आर कोड लावण्यात येईल. सदर क्यु आर कोड स्मार्ट फोनद्वारे स्कॅन केल्यानंतर त्या झाडाविषयी संपूर्ण माहिती एका क्लिकवर नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होईल.
या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या 21 उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुमारे 2000 झाडांवर क्यु आर कोड लावण्यात आलेले आहेत.
उद्यानांच्या निगा देखभालीसाठी Mobile / Web Based Application :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने, रस्ता दुभाजक, हरित पट्टे व चौक यांच्या दैनंदिन निगा देखभालीवर देखरेख करण्यासाठी मोबाईल ॲप्लीकेशन / सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरु असून लवकरच त्याचा वापर करण्यात येणार आहे. सदर मोबाईल ॲप्लीकेशन / सॉफ्टवेअर मुळे ठेकेदारांच्या कामांवर अंकुश ठेवण्यास व उद्यान कामे वेळेत पुर्ण करण्यास मदत होईल.
21 ) प्रदुषण मुक्त व धूळ मुक्त ठाणे :
शहर पर्यावरणामध्ये सुधारणा :
15 वा वित्त आयोग अंतर्गत हवा गुणवत्ता सुधारणेकरिता प्राप्त अनुदानातून 123 इलेक्ट्रीक ई-बस प्राप्त झाल्या आहेत. या इलेक्ट्रीक बसेसना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच आणखी 86 वातानुकुलित ई-बस खरेदी करणे प्रस्तावित आहे.
बाळकुम, माजिवडा व पडले गाव येथील स्मशानभूमीमध्ये PNG वरील शवदाहिनी कार्यान्वित करणे :
ठाणे महानगरपालिकेद्वारे बाळकुम, माजिवडा व पडले गाव येथील स्मशानभूमीमध्ये PNG वरील शवदाहिनी उभारण्याचे काम अंतिम टप्पात असून एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे.
Ø धुळमुक्त ठाणे – मेकॅनिकल डस्ट स्विपींग मशिन :
महापालिका क्षेत्रातील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्याकरिता 7 डस्ट स्विपींग मशीन खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. सदर प्रक्रियेसाठीचा लागणारा कालावधी लक्षात घेता तात्पुरती व्यवस्था म्हणून मर्यादीत कालावधीसाठी 2 मेकॅनिकल डस्ट स्विपिंग मशिन्स भाडेतत्वावर घेण्यात आल्या असून त्या सध्या कार्यान्वीत आहेत.
Ø मृत प्राण्यांसाठी शवदाहिनी (Incinerator) :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीची सोय उपलब्ध नव्हती. याबाबत पाळीव प्राण्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे स्वच्छ हवा कृती आराखड्या अंतर्गत प्राप्त अनुदानातून ॲनिमल Incinerator च्या उभारणीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
22) अमृत योजना -2.0 पाणी पुरवठा व्यवस्था :
अमृत योजना – 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारीकरणासाठी रु.323 कोटी 72 लक्ष रकमेची योजना दि.3 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली. यामध्ये राज्य शासन 25% ,केंद्र शासन 25% व महापालिका हिस्सा 50% असा सहभाग आहे. या अंतर्गत 14 जलकुंभ, 85 कि.मी. लांबीची जलवाहिनी वितरण व्यवस्था , 1 एम.बी.आर. (10 द.ल.लि.) व 4 ठिकाणच्या पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याच्या कामाचा अंतर्भाव आहे. यामध्ये 18,255 हाऊस कनेक्शन देण्यात येणार असून सुमारे 1,14,248 कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. या कामाअंतर्गत 4 पॅकेज पैकी 3 पॅकेजसाठी कार्यादेश देण्यात आला आहे. सदरचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
यासाठी सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात रु. 20 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
23) दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था :
दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा (रिमॉडेलिंग) व नव्याने जलकुंभ बांधणेचे काम हाती घेण्यात आले. सदरचे काम “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत सुरु आहे.
सदर प्रकल्पांतर्गत एकूण 13.016 कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी टाकणे, 99.172 कि.मी. लांबीची वितरण जलवाहिनी टाकणे व 17 जलकुंभ बांधणेच्या कामाचा समावेश आहे. त्यापैकी एकूण 9.057 कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी व 74.986 कि.मी. लांबीची वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कौसा हॉस्पीटल मागील भूखंडावर दोन जलकुंभ बांधण्याचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. सदर कामावर आजपर्यंत रु.165 कोटी 40 लक्ष खर्च झालेला आहे.
सदर प्रकल्पाची भौतिक प्रगती 70% असून आर्थिक प्रगती 66% आहे. सदर प्रकल्प माहे मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
24) मलनि:सारण योजना :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे.एन.एन.यु.आर.एम अंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्र. 1, 2 व 3 अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था पूर्ण झालेल्या भागातील सुमारे 7890 हाऊस कनेक्शनची कामे पूर्ण झालेली असून, उर्वरित कामे मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या सर्व कामांसाठी सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात JNNURM अंतर्गत रु. 8 कोटी 47 लक्ष, अमृत योजना फेज 1 साठी रु. 2 कोटी 64 लक्ष, भुयारी गटार योजना टप्पा 5 साठी रु.7 कोटी व प्रभागात मलवाहिन्या टाकणे – हाऊस कनेक्शनसाठी रु. 25 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
25) अमृत योजना -2 मलनि:सारण प्रकल्प :
महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरातील मलनि:सारण वाहिन्या, पंपिंग स्टेशन, मलप्रक्रिया केंद्र इ. सह मलनि:सारण व्यवस्था यापुर्वी हाती घेऊन पूर्ण केलेली आहे. दिवा प्रभाग समिती हद्दीत मलनि:सारण व्यवस्था राबविण्याकरिता शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर प्रकल्पास शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर दिवा प्रभाग समिती क्षेत्रासाठी मलनि:सारण व्यवस्था प्रकल्प, हाऊस कनेक्शन व मलप्रक्रिया केंद्रासह हाती घेण्याचे नियोजन आहे.
26) वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना :
ठाणे महानगरपालिका हद्दीतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शनवर गोल्डन डाईज सर्कल येथे घोडबंदर रोडकडून मुंबई व ठाणे रेल्वे स्टेशनकडे, मुंबई कडून घोडबंदरकडे व नाशिक-भिवंडी कडून येणारी घोडबंदर रोडकडे जाणारी वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. सदर ठिकाणी वाहतुक नियोजन करणेकरीता स्वयंचलित वाहतुक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
के.व्हीला ते साकेत रोड च्या दरम्यानचा नाला बंदिस्त करुन माजिवडा वरुन येणारी वाहतूक थेट नवीन कळवा पुलाकडे वळविण्याचे काम सुरु असून सदरचे काम या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
घोडबंदर रस्त्यावर नेहमी वाहतुक कोंडी होत असते. ही वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी अस्तित्वातील रस्ता मोठा करण्यासाठी लगतचे सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यात करुन घोडबंदर रस्ता प्रशस्त करण्याचे प्रयोजन आहे. सदर काम एम.एम.आर.डी.ए. कडून मंजूर झाले असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात लवकरच केली जाईल.
27 पार्किंग व्यवस्था :
वागळे इस्टेट परिसरात एम.आय.डी.सी. च्या प्लॉटवर सात मजली पार्कींग व्यवस्था विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. नौपाडा येथील शाहू मार्केट व बहुमजली पार्कींग खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर पार्कींग व्यवस्था, महापालिका क्षेत्रात पार्कींगसाठी आरक्षित भूखंड तसेच शहर विकास विभागामार्फत उपलब्ध झालेले सुविधा भूखंड. तसेच ठाणे रेल्वे स्टेशन येथील पुनर्विकासांतर्गत पार्कींग व्यवस्थेची सुविधा खाजगी भागिदारी तत्वावर विकसित करणे प्रस्तावित आहे.
28) बंदिस्त नाल्यावर पार्कींग व्यवस्था :
महापालिका हद्दीतील जास्त उंचीचे नाले बंदिस्त करुन त्यावर पार्कींग व्यवस्था किंवा फेरीवाला क्षेत्र म्हणून त्याचा वापर करण्याचे प्रयोजन असून याबाबतचा कृती आराखडा तयार करुन अनुदान मंजुरीसाठी शासनाकडे सादर करुन त्या मंजुरीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
29) ठाणे मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक :
ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची 14.83 एकर जागा उपलब्ध होणेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार स्टेशनकरीता आवश्यक असलेल्या जागेमध्ये असलेल्या 5 महिला रुग्ण कक्षासाठी महापालिकेने नवीन वास्तू बांधून दिलेली असून त्याचा वापर सुरु झाला आहे. रुग्ण कक्ष स्थलांतरीत झाल्यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम माहे ऑक्टोबर 2023 पासून सुरु करण्यात आले आहे. या नवीन स्थानकाकडे जाण्यासाठी 3 मार्गिका असून 1 मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गास जोडण्यात येणार आहे. या स्थानकाच्या कामासाठी एकूण रु. 119 कोटी 32 लक्ष तसेच जोडरस्ते आणि Circulating Area विकसीत करणेसाठी रु. 143 कोटी 70 लक्ष असा एकूण रु. 263 कोटी 02 लक्ष इतका खर्च येणार आहे. हे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे.
सध्या ठाणे स्थानकावर दररोज सुमारे 7,50,000 प्रवासी व मुलुंड स्थानकावर साधारण 3 लाख प्रवासी येत असतात. नवीन उपनगरीय स्थानक तयार झाल्यावर ठाणे स्थानकावरील सुमारे 232500 व मुलुंड स्थानकावरील 63,000 इतक्या संख्येने प्रवासी भार कमी होणार आहे. नवीन स्थानकाचा फायदा प्रामुख्याने वागळे इस्टेट, घोडबंदर रोड परिसरामधील नागरिकांना होणार आहे. तसेच भविष्यात वाढणा-या लोकसंख्येसाठी सदर स्थानक उपयुक्त ठरणार आहे.
30) क्लस्टर योजना :
मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे ठाणे शहर आमूलाग्र बदलाचे साक्षीदार होणार आहे. पंधराशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पांतर्गत हजारो जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि बेकायदेशीर इमारतींचा पुनर्विकास केला जाईल, जेणेकरुन सध्याच्या रहिवाशांना सुरक्षित आणि मालकी हक्काची घरे मिळतील.
ठाणे महानगरपालिकेने एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे (एकूण क्षेत्र 1508 हेक्टर) अधिसुचित केले आहेत. सदर अधिसुचित हद्दीमधील एकूण 865.53 हेक्टर क्षेत्राचे एकत्रिकृत सर्व्हेक्षण म्हणजेच CIMS (Cluster Implementation Management System) पद्धतीने सर्व्हेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे.
ठाणे महानगरपालिकेमार्फत नागरी पुनरुत्थान योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता महापालिकेस महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून भूखंड प्राप्त झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत यु.आर.पी.क्र.12 किसननगर मधील यु.आर.सी. क्र.1 व 2 साठी 30,000 घरांच्या पुनर्विकासासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आलेली असून बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहेत.
यु.आर.सी. क्र.5 व 6 मधील 16,000 घरांच्या पुनर्विकासासाठी महाप्रीत यांची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून पुनर्विकासाची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
31) धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक :
ठाणेकरांचे श्रद्धास्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे स्मारक ठाणे शहरात व्हावे अशी लोकभावना आहे. यासाठी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार उपवन येथील महापौर निवास या वास्तुमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक करण्याचे प्रयोजन आहे. तसेच सभोवतालच्या परिसराचा देखील विकास केला जाणार आहे. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात रु. 5 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
32) महापौर निवास :
महापौर निवास हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचे प्रयोजन आहे. यासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात रु. 1 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
33) आनंदाश्रम परिसर सुधारणा :
शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तसेच सर्व ठाणेकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणा-या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यांत्मक विकास करण्यासाठी सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभीवंत दिवे , साईनेजेस , भित्तीचित्रे, म्युरल्स इत्यादी बाबी करण्याचे नियोजित आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात आनंदाश्रम परिसर सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत रु.1 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
34) चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतिगृह :
भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देणारी महापालिकेमार्फत चालविण्यात येणारी देशातील पहिली चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ठाण्यात आहे. या संस्थेसाठी, वसंतविहार येथील आरक्षित भुखंडावर नवीन इमारत व वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.
सध्या वर्तकनगर येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेची ही प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. स्पर्धा परिक्षांसाठी या संस्थेत मार्गदर्शन करण्यात येते. ठाण्यासह राज्यभरातील अनेक विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी येत असतात. मात्र वसतिगृहाची व्यवस्था नसल्याने निवासाच्या खर्चाचा भार प्रशिक्षणार्थींवर पडतो. त्यामुळे, या संस्थेसाठी स्वतंत्र इमारत आणि वसतिगृह बांधणेचे प्रस्तावित आहे. यात 100 विद्यार्थींनी आणि 100 विद्यार्थी अशा 200 विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाचा या इमारतीत समावेश असणार आहे. त्याचबरोबर, वातानुकुलीत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायाम शाळा, वाचनालय, प्रशस्त हॉल आदी सुविधा या इमारतीत असतील.
35) कला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम :
भारतरत्न स्व.लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल):
महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथे आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) बांधण्यात येत आहे. या संगीत विद्यालयात गायन, वादन यांचे शास्त्रोक्त शिक्षण घेता येणार आहे. यासाठी राज्य शासनाने रु.25 कोटी निधी मंजूर केला आहे.
राम गणेश गडकरी रंगायतन अद्ययावतीकरण :
नाटयक्षेत्रातील नामवंत नाटयकर्मी यांचेसोबत पाहणी करुन त्यांच्या सुचनेनुसार राम गणेश गडकरी रंगायतनाच्या अद्ययावतीकरणासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. यासाठी पायाभुत सुविधेंतर्गत शासनाकडून रु.8 कोटी अनुदान मंजूर झाले आहे.
विचारमंथन व्याख्यानमाला :
ठाणे महानगरपालिकेतर्फे महनीय व्यक्तींचे स्मृतिदिन तसेच राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस साजरे करण्यात येतात. त्या निमित्ताने, त्या व्यक्तीचे विचार, कार्य कर्तुत्व, या दिनाचे औचित्य यांचा पुनःपरिचय व्हावा यासाठी व्याख्यान आयोजित करण्याचा उपक्रम ठाणे महानगरपालिकेने विचारमंथन व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुरु केला आहे. ही व्याख्यानमाला फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू झाली. ही व्याख्यानमाला सर्व नागरिकांसाठी खुली असते.
आतापर्यंत विचारमंथन व्याख्यानमालेत 13 पुष्पे झाली आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अभय ओक, निवृत्त न्यायमूर्ती श्री.सत्यरंजन धर्माधिकारी, राज्याचे मुख्य सचिव श्री. नितीन करीर, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव, प्रा. डॉ. हरी नरके, प्रा. डॉ. सदानंद मोरे, मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, श्री.बाबा भांड, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. रमेश जाधव, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्री. श्रीकांत बोजेवार, एबीपी समूहाचे ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर आदी मान्यवरांनी विचारपुष्प गुंफले आहे. यापुढेही सदर व्याख्यानमाला सुरु राहणार आहे.
दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे सिन्थेटिक ट्रॅक :
ठाणे जिल्हयातील खेळाडूंची ॲथलेटिक्स मधील प्रगती व नवनवीन तयार होत असलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेते खेळाडू पाहता खेळाडूंना सरावासाठी व स्पर्धा आयोजित करणेकामी ठाणे शहरात 400 मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक उपलब्ध करुन देण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे ॲथलेटिक्सकरीता नवीन सिन्थेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात रु.80 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचे विस्तारीकरण :
महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुदींतर्गत दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचे विस्तारीकरण करणे या कामाकरीता रु.41 कोटी 64 लक्ष निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. सदर कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
36) परिवहन सेवा :
ठाणे महापालिका क्षेत्राचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. ज्यायोगे सर्वसामान्य नागरिकांना सुलभ प्रवासाचे साधन उपलब्ध होईल आणि खाजगी वाहने कमी प्रमाणात रस्त्यावर येतील. त्याचा दुहेरी फायदा होऊन वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रदूषणही कमी होण्यास मदत मिळेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळावी तसेच, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आदींना किफायतशीर प्रवास साधन उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्यात येत आहे.
महापालिकेकडून देण्यात येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य हे प्रती किमी मागे होणाऱ्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात असेल. यासाठी एक सूत्र निश्चित केले जाणार असून त्यानुसार अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, प्रवासीस्नेही आणि किफायतशीर राहील, यावर भर असेल. तसेच परिवहन सेवेकडील सर्व निविदा KPI based असतील.
केंद्र शासनाच्या NCAP अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाकडे पर्यावरण पुरक 123 इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी 86 ई-बस खरेदी प्रस्तावित आहे.
PM E- बस सेवांतर्गत ठाणे शहराची निवड :
सदर योजनेतून ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेस 100 ई – बसेस मंजूर झाल्या असून सन 2024-25 या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने या बसेस दाखल होणार आहेत. यासाठी कोलशेत बस आगार विकसित करणेसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर आगार सन 2024-25 मध्ये विकसित केले जाणार आहे. इलेक्ट्रीक बसेसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच प्रदूषण पातळीत घट होईल तसेच नागरीकांच्या प्रवास भाडे खर्चात बचत व इंधन खर्चात बचत होणार आहे.
परिवहन सेवेत दाखल झालेल्या नवीन ई बसेस तसेच यापुढे दाखल होणा-या बसेस व अस्तित्वातील बसेस यांचा विचार करता वाहन वाहकांची संख्या अपुरी पडणार आहे. या सर्व बसेस पूर्ण क्षमतेवर चालविण्यासाठी 486 वाहकांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी बाहययंत्रणेद्वारे नियुक्ती करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे.
दर्जात्मक सुधारणांसाठी प्रयत्न :
ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण 131 शाळांमध्ये 29,127 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात 100% सवलत सध्या देण्यात येते. त्यांचे राहत्या घरापासून शाळेचे ठिकाण या प्रवासाचा आढावा घेऊन ज्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या अधिक असेल त्या ठिकाणी अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मासिक/द्वैमासिक/त्रैमासिक पास योजना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.मासिक पासामध्ये 22 दिवसांचे भाडे आकारुन 30 दिवस प्रवास , 40 दिवसांचे भाडे आकारुन 60 दिवस प्रवास, 62 दिवसांचे भाडे आकारुन 90 दिवस प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय व ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा या कार्यालयांशी समन्वय साधून ठाणे शहरामध्ये अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यारीता सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्यायोगे परिवहन सेवेच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे. परिवहन सेवेने Where Is My TMT Bus हे मोबाईल ॲप विकसित केले असून त्यामुळे प्रवाशांना बस कोठून कोठे जाणार आहे व ती किती वेळेत कोणत्या बसस्टॉपवर पोहोचेल याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुविधेची विश्वासार्हता वाढेल. परिवहन सेवेकडे The Deployment and Maintenance of Digital (Mobile) Ticketing & Digital Passes with Validation System सुविधा लागू करण्यात येणार आहे. त्याकरीता स्वारस्याची अभिव्यती अर्थात Expression of Interest (EOI) मागविण्यात येवुन कार्यादेश देण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येत आहे. Mobile Ticketing मुळे खालील प्रमाणे फायदा होणार आहे.
a. परिवहन सेवेसोबतच सर्व बस प्रवाशांना अद्ययावत व सुरक्षित तिकीट सुविधा मिळणार असून वाहकांचा देखील सुट्यापैशांचा ताण कमी होऊन प्रवासी व वाहक यांच्यातील सुट्या पैशांवरुन होणारे वाद-विवाद टळतील.
b. Mobile Ticketing मुळे प्रवाशांसाठी दैनंदिन, आठवड्याचे व पंधरवड्याचे पास उपलब्ध करुन देणे सोयीस्कर होणार आहे.
c. दैनंदिन तसेच मासिक पासधारक यांना मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून पास काढणे सुलभ होणार आहे.
d. या मोबाईल ॲपद्वारे प्रवासी तिकीट सहज बुक करु शकतील.
e. क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन वापरून कंडक्टरद्वारे तिकिटे प्रमाणित करण्यात येणार आहेत.
f. तिकीटाचे पैसे Online परिवहन सेवेकडे जमा होणार असल्याने तिकीट विक्रीची रक्कम बँकेत मॅन्युअली भरणे, रोख रक्कम हाताळणे याकरीता होणारा त्रास कमी होणार आहे.
6) ITMS व CCC आणि संगणक प्रणाली अद्ययावत करण्यात येत असून त्यामुळे प्रशासनाचे सर्व बसेसवर नियंत्रण राहील. वेबसाईट व ॲपद्वारे प्रवाशांना बस आगमन निर्गमनाची अचूक वेळ प्राप्त होण्यास मदत होईल. Route Rationalisation साठी व Real Time ticket collection ची माहिती प्राप्त होणार आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेसाठी सन 2024-25 साठी पहिल्या टप्प्यात रु.260 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
37) उपद्रव शोधपथक (Nuisance detection Squad) :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मा.मुख्यमंत्री यांचे संकल्पनेनुसार शहराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले आहे, तथापि, काही नागरिक आपल्या कृतीतून उपद्रव निर्माण करतात, (उदा. रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा लघुशंका करणे) यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रती पथक 02 सुरक्षा रक्षक असलेले 50 उपद्रव शोध पथक तयार करण्यात येत आहेत. ही पथके प्रभाग स्तरावर गस्त घालून जे नागरिक उपद्रव निर्माण करतील, अशा व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यपध्दती अंतिम टप्प्यात आहे. हा उपक्रम प्रथमच ठाणे शहरात राबविण्यात येत आहे.
38) Advance Locality Management (ALM):
ठाणे शहराकरिता महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा प्रभावीपणे पुरविण्याच्या दृष्टीकोनातून लोकसहभाग असणे आवश्यक आहे. याकरिता ठाणे महानगरपालिका प्रशासन ALM (ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट) ही संकल्पना सन 2024-25 मध्ये नागरिकांसमोर सादर करणार आहे.
यामध्ये प्रभाग स्तरावर नागरिकांचे समूह एकत्र येवून ALM समिती स्थापन करतील व अशा ALM समितीमार्फत त्यांचे क्षेत्रातील प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी पुरविल्या जाणा-या सेवांवर देखरेख ठेवली जाईल व या सेवांबाबत नागरिकांमध्ये देखील जागरुकता निर्माण करतील , अशा सेवा-सुविधा मध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास महापालिकेस पर्यायासह सुचवतील. या ALM समितींना आवश्यकते सहकार्य महापालिकेकडून पुरविले जाईल तसेच त्यांनी अनुभवाच्या आधारावर सुचविलेल्या प्रतिसादावर (Feedback) कार्यवाही करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाईल. याद्वारे महापालिका पुरवित असलेल्या सेवा-सुविधांच्या गुणवत्तेत वाढ होईल व ठाणेकर नागरिकांचे जीवनमान प्रत वाढण्यास निश्चित मदत होईल.
39) प्रशासकीय कामकाजात सुधारणा
महापालिका अंतर्गतच्या सर्व आस्थापनामधील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने घेण्यात येत आहे.
सध्या सर्व विभागांचे संगणकीय कामकाज स्वतंत्रपणे होत आहे. सर्व विभागांना ERP या संगणक प्रणालीद्वारे एकत्रित जोडणेबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच ती कार्यान्वीत होणार आहे.
TDRF सक्षमीकरण:
ठाणे शहर व महाराष्ट्रात आलेल्या आपत्तीच्या वेळी TDRF पथक तात्काळ पोहचून आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदतकार्य करते. TDRF ची उपयुक्तता पाहता, यामधील जवानांना सक्षम बनविणे आवश्यक असून याअंतर्गत त्यांच्या फिजीकल फिटनेसकरिता तज्ञ प्रशिक्षक नेमणे व पथकासाठी स्वतंत्र फिटनेस झोन बनविण्याचे विचाराधीन आहे.
या सर्व योजना, अभियान व प्रकल्पांसाठी सन 2024-25 मध्ये महसुली खर्च रु.3345 कोटी 66 लक्ष , भांडवली खर्च रु. 1679 कोटी , अखेरची शिल्लक रु. 35 लक्षसह एकूण रु.5025 कोटी 01 लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात येत असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.