ठाणे – ठाण्यातील मानपाडा परिसरात राहणाऱ्या समशेर बहादुर सिंग आणि मिना समशेर सिंग या वृद्ध दाम्पत्याच्या खून प्रकरणी चितळासर मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निसार अहमद कुतबुद्धीन शेख आणि रोहित उतेकर अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, मानपाडा परिसरातील दोस्ती एम्मेरिया, एमएमआरडीए बिल्डींग नं १ या ठिकाणी समशेर बहादुर रणबाज सिंग, वय ६८ वर्षे आणि त्यांची पत्नी मिना समशेर सिंग, वय ६५ वर्षे, असे दोघे राहत होते. दरम्यान, त्यांचा मुलगा सुधीर सिंग याने त्यांच्या आई वडिलांना फोन केला असता वडिलांना फोन बंद येत होता व आईन फोन उचलत नाही म्हणून सुधीर सिंग हे आई वडिलांच्या घरी आले असता त्यांना आई वडील दोघेही मृत अवस्थेत दिसले. सुधीर यांनी याबाबत तात्काळ पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत मिळालेल्या माहितीच्या आधारे निसार अहमद कुतबुध्दीन शेख आणि रोहीत सुरेश उतेकर या दोघांना अटक केली. विशेष म्हणजे हे दोघेही त्याच बिल्डिंग मध्ये राहत होते.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बाथरुमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला आणि समशेर बहादुर सिंग आणि मिना समशेर सिंग या दोघांचा गळा दाबून हत्या करून मोबाईल, बांगडया, कानातले आणि इतर सोन्याचे दागिने असा ऐवज चोरी केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर प्रकरणी पोलिसांनी मोबाईल, बांगडया, कानातले आणि इतर सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच या दोघांना अटक केली.