मुंबई – बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरीकांना औषधे विक्री करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या १० जणांच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० पोलिसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाणेच्या हद्दीत व्ही ३, ग्लोबल सर्विसेस, ३१८, ३ रा मजला, द समिट बिजनेस बे (ओमकार), वेस्टर्न एक्सप्रेस मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी पूर्व येथे काही इसम बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून इंटरनेट कॉलद्वारे अमेरीकन नागरिकांना कॉल करुन औषध विकण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकणी छापा टाकला असता, त्याठिकाणी एकूण २३ संगणकाला जोडलेल्या हेडफोन माईक वरून लिगल गेटवे बायपास करून इंटरनेटद्वारे व्हीओआयपी कॉलद्वारे अमेरीकन नागरिकांच्या संपर्कात येऊन अमेरीकन नागरीक असल्याचे भासवून ऑनलाईन फार्मसी (स्टेटस ऑनलाईन फार्मासी, गेट फार्मासी व टाईम हेल्थ) या खोटया कंपनीच्या माध्यमातून बोलत असल्याचे सांगून खोट्या नावाचा वापर करून अमेरिकन अॅक्सेंट मध्ये कॉल करुन व्हायग्रा, सिआलीस व लिवेट्रो इत्यादी औषधे विकण्याचे अमिष दाखवून त्यांची ऑर्डर घेऊन ऑनलाईन त्यांच्याकडून डॉलरमध्ये पैसे घेऊन महाराष्ट्र /केंद्र शासनाचा महसुल बुडवून फसवणूक करत असल्याचे दिसून आले.
सदर प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे कॉल सेंटर मधील सर्व संगणकीय व इतर इलेक्ट्रीक साधन सामुग्री ताब्यात घेऊन एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकूण १० जणांना अटक केली.