पालघर – उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकावर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नितीन संखे असे या दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे.
बिअर दुकानाचा परवाना देण्याकरीता नितीन यांनी तक्रादार यांच्याकडे ४ लाख आणि त्यानंतर तडजोड करून ३ लाख ४० हजार रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे बिअर शॉपचे लायसन्स मिळण्याकरता जानेवारी २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पालघर येथे अर्ज दिला होता. राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, पालघर येथील दुय्यम निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले नितीन संखे यांनी तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बिअर शॉपचे लायसन्स देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे ४,००,०००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयात प्राप्त झाली होती.
त्याअनुषंगाने संखे यांनी तक्रादार यांच्याकडे प्रथम ४,००,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ३,४०,०००/- रूपये लाच म्हणून स्विकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.