कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील एका सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भरत बुळे असे या सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची ड्युटी लावण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने बुळे यांना रंगेहात पकडले. सुरक्षा रक्षकांना त्यांच्याकडून ड्युटी देण्याचे काम केले जाते. दोन सुरक्षा रक्षकांना त्यांनी ड्युटी लावण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कमेची मागणी केली होती. सुरक्षा रक्षकाने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती.
तक्ररीच्या अनुषंगाने एसीबीने केडीएमसी मुख्यालयात छापा टाकून भरत बुळे यास १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. दरम्यान, पुढील तपास चालू आहे.