सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांवर पुन्हा ताशेरे…

Published:

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले.

विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे, जून पासून या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत आता सुनावणी व्हायला हवी अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक येत्या मंगळवार पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी सादर करावे. अन्यथा आम्हाला ही सुनावणी विशिष्ट कालमर्यादेत पार पाडण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशारा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला.

येत्या १७ तारखेला तुम्ही परत या आणि नवीन रुपरेषा द्या. कारण हा पोरखेळ चालू आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक कोर्टाला मान्य नाहीये. तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करत आहात, तसेच अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांनी अध्यक्षांसोबत बसावे आणि त्यांना सुप्रीम कोर्ट काय आहे ते समजवून सांगावे आणि आमचे आदेश पाळले गेले पाहिजेत हे देखील सांगाव अशा शब्दात राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले.

जर तुम्ही निश्चीत वेळापत्रक दिले नाही तर आम्हाला दोन महिन्याचा कालावधी तुमच्यावर लादावा लागेल असे देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. पोरखेळ चालू आहे. पुढच्या निवडणूका येण्यापूर्वी निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकांसाठी थांबला आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page