ठाणे – मुंबई, ठाणे व भिवंडी परिसरातून चोरलेल्या सुमारे २० लाख रुपये किंमतीच्या एकूण १८ चोरीच्या रिक्षा हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक- २, भिवंडी पोलिसांना यश आले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
रशीद युनुस खान, सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी, जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी अशी यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, भिवंडी येथे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्यानुषंगाने पोलिसांचा तपास चालू होता. दरम्यान, रिक्षा चोरी करणारे भिवंडी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाण सापळा रचून या चौघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीच्या एकूण १८ चोरीच्या रिक्षा हस्तगत करून १२ गुन्ह्यांची उकल केली आहे.
दरम्यान, सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना,एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजेंट म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.