कोल्हापुर – आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याचेही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केले. तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, हे आदेश झुगारुन हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या.

हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा फोटो फडकवणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांना दाद दिली नाही. उलट आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.