पालघर जिल्ह्यात आदिवासी संघटनाकडून निषेध…
पालघर – आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती व आदिवासी समाजाचे लोकप्रिय वाद्य तारपा नृत्य या नृत्याची महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीव्ही कार्यक्रमात विनोदी कलाकार समीर चौघुले यांनी वेडावाकडा नृत्य करून आदिवासी समाजाच्या नृत्याची खिल्ली उडवून आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या असून समाजमाध्यमातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आदिवासी समाजाचे तारपा हे एक प्रसिद्ध वाद्य आहे. हे वाद्य आदिवासी समाजाचे संस्कृती चे प्रतीक असून हे वाद्य समाजामध्ये विशिष्ट कला असणारे कलाकार हे वाद्य वाजवतात. आदिवासी समाजाचे सण, उत्सव, देवतदेवतांचे कार्यक्रम आदी कार्यक्रमात सूर, तालावर व लयबद्द पद्धतीने वाजले जाते.तारपा सुराच्या प्रत्येक चालीवर एक विशिष्ट शिस्तबद्ध नाच केला जातो.
मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीर चौघुले यांचा पूर्ण विनोद घसरला. यामध्ये या कार्यक्रमातील परीक्षक व इतर कलाकार मोठमोठ्याने हासून या विनोदाला दाद देत आहे. आदिवासी समाजाचे संस्कृती चे प्रतीक असणाऱ्या वाद्यनृत्याची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडिया आल्याने आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध म्हणून पालघर जिल्ह्यातील चारोटी नाका येथे दि.३० मे रोजी आदिवासी संघटना व जिल्ह्यातील युट्युब कलाकार यांच्या वतीने समीर चौघुले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समीर चौघुले व त्याच्या टीम ने आदिवासी समाजाची जाहीरपणे माफी मागावी, याबात चारोटी नाका व जव्हार या ठिकाणी चौगुले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बॅनर झळकवले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अँड. काशिनाथ चौधरी, आदिवासी एकता परिषदेचे डॉ. सुनिल पऱ्हाड, डहाणू पंचायत समिती माजी सभापती स्नेहलता सातवी, जिल्हा परिषद सदस्या लतिका बालशी,भूमिसेनेचे भरत वायेडा,विविध आदिवासी संघटनाचे पदाधिकारी, युट्युब कलाकार व आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जव्हार यांना निवेदन ही देण्यात आले.