पालघर – डहाणू तालुक्यातील मौजे ओसरविरा येथील सोनाली वाघात गरोदर असताना बाळासह मृत पावल्या त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट जिल्हा परिषद पालघर सदस्य अँड. काशिनाथ चौधरी यांनी घेतली.
सदर माता हि जोखमीची असताना सुरवातीला तवा येथे आरोग्य केंद्रात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कासा येथे दाखल केले, मात्र त्याठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सोनाली वाघात या गरोदर मातेचा मुलासह मृत्यू झाला. असा आरोप मृत झालेल्या मातेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन काशिनाथ चौधरी यांनी ओसरविरा येथिल सोनाली वाघात यांच्या मृत्यू प्रकरणी तवा प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन तेथील वैदयकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक गरोदर मातांना व इतर रुग्णांनाही आवश्यक त्या समुपदेशासह वेळेत उपचार मिळावेत असा सूचनाही केल्या. तसेच या प्रकरणी शनिवार दि.२० मे रोजी सकाळी १०:०० वाजता उपजिल्हा रुग्णालय कासा येथे सदर प्रकरणी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ भेट देणार असल्याचे निवेदनही दिले.
या दुर्दैवी घटनेच्या दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात शेवटपर्यंत पाठपुरावा करणार, जेणेकरून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात असा दुर्दैवी प्रसंग कोणावरही येऊ नये असेही वरील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य काशिनाथ चौधरी, माजी सभापती स्नेहलता सातवी, जि.प.सदस्या लतिका बालशी, माजी जि.प.सदस्या जयश्री केणी, पं.समिती सदस्य अरुण कदम, शैलेश हाडळ, स्वाती राऊत, माजी पं.स.सदस्या तथा डहाणू तालुका महिला अध्यक्षा सुमन राबड, तवा ग्रामपंचायत चे सरपंच लहू बालशी वैद्यकीय अधिकारी व तवा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.