मुंबई – ए.टी.एम. मशीन मधून पैसे काढून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणा-या दोघांना गुन्हे शाखा कक्ष ३, विरार पोलिसांनी अटक करून एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले. साहील सलीम शेख आणि सागर अभिजीत मंडल अशी दोघांची नावे आहेत.
फिर्यादी रोहीत राय हा तरुण हिताची एटीएम, धानीवबाग तलावाचे समोर, धानीव बाग, नालासोपारा पूर्व, येथे एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेला असता २ अनोळखी इसमांनी एटीएम सेंटरमध्ये येऊन या तरुणाला बोलण्यात गुंतवून त्याचे एटीएम घेऊन त्या तरुणाच्या नकळत ४४,०००/- रुपये काढले तसेच एटीएम सेंटरमध्ये आलेल्या आणखी एका इसमाचे १९,०००/- रुपये काढून फसवणूक केल्याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे साहील सलीम शेख आणि सागर अभिजीत मंडल या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मोटार सायकल आणि १,५०,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.