सोलापूर – २ अधिकाऱ्यांसह एका महिला कॉन्स्टेबलला लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी ताब्यात घेतले. संभाजी साहेबराव फडतरे, प्रियंका बबन कुटे, सिद्धाराम आनंदेंनप्पा बिराजदार अशी यांची नावे असून, हे तिघे राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर येथे अनुक्रमे निरीक्षक, वर्ग 2, महिला कॉन्स्टेबल, वर्ग 3, सहा. दुय्यम निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ३,०००/- हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीने त्यांना ताब्यात घेतले.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून सदर बार अँड रेस्टॉरंट च्या अनुषंगाने असलेले स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून) देण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथील प्रियांका कुटे आणि बिराजदार यांनी ४,०००/- रू लाचेची मागणी केली असता फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून ३,००० रू. लाच रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे कुटे यांनी ३,००० रू. लाच रक्कम स्वीकारली असता या तिघांना एसीबीने ताब्यात घेतले.