कल्याण – कल्याण स्टेशन परिसरातील हॉटेल दिपक गेल्या ४० ते ५० वर्षापासून मोक्याच्या ठिकाणी अस्तित्वात आहे. हॉटेलची स्थिती धोकादायक आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी केडीएमसीचे स्ट्रक्चरलवरील पॅनल तसेच सहाय्यक आयुक्तांसमवेत पोलिसांचा लवाजामा या ठिकाणी गेला. मात्र हॉटेल मालकाने पालिकेच्या आदेशाला न जुमानता हॉटेलचे शटर बंद केले. त्यानंतर ते उघडू न दिल्याने पालिकेला स्ट्रक्चरल ऑडिट न करता रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज सुरू आहे. हॉटेलचा काही भाग स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून दिपक हॉटेलचे मालक विरुद्ध कल्याण डोंबिवली महानगरपालिका असा खटला न्यायालयात सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने रस्ता रुंदीकरण करतानाही हॉटेल ‘जैसे थे स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
केडीएमसीच्या स्ट्रक्चरल पॅनलवर असलेल्या व्ही जे टी आयच्या टीमला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी बोलून घेतले होते. मालकाला पालिकेने पत्र देऊन व्हीजेटीआयच्या पॅनल वरील अधिकार्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास कळवले होते. मात्र हे पत्र दिल्यापासून मालकाने हॉटेल बंद ठेवले होते. संपूर्ण टीम हॉटेल जवळ पोलीस बंदोबस्तात पोहोचली असता हॉटेल मालकाने हॉटेलचे शटर उघडू न दिल्याने स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे व त्यांच्यासोबत आलेली पॅनलवरील स्ट्रक्चरलची टीम तसेच पोलिसांचा फौजफाटा ऑडिट न करता माघारी फिरला.
दरम्यान, महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार अविनाश वाकचौरे यांनी यासंदर्भात हॉटेल मॅनेजमेंट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना सदर घटने बाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यानंतर महापालिका अधिकारी तुषार सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कल्याणमध्ये ९ जणांना धोकादायक इमारती संदर्भात नोटीस दिलेल्या आहेत व महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.