धाराशिव – राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. बंडासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी तब्बल १५० बैठका केल्या आहेत असेही ते म्हणाले.
सरकार सत्तेत आल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करून सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात तब्बल १०० ते १५० बैठका झाल्याचा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला.