डोंबिवीली – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज तर्फे करण्यात आला.
महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कर्तव्य जननी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार ११ मार्च २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता कुडाळ देशकर हॉल डोंबिवली (पूर्व) याठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करून आणि ईशस्तवन गीत गाऊन करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे सत्कार आणि भाषण झाल्यानंतर डॉक्टर, नर्स,
ऍडव्होकेट, शिक्षिका, साहित्यिक, रिक्षाचालक, उद्योजिका, कला, संगीत, पोलीस, होमगार्ड, किन्नर, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, बस कंडक्टर, टॅक्सी चालक, समाजसेविका इ क्षेत्रात उंचावत जाणाऱ्या ९० कर्तृत्ववान महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्तव्य जननी हे सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला रमा सावंत (वाघुले) (निवृत्त न्यायाधीश), जगन्नाथ पाटील (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र), डॉ. शुभदा खटावकर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व मा. मुख्याध्यापिका, डॉ. अंजुषा पाटील (माजी, मुख्याध्यापिका, ठामपा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला युवराज सुर्ले (मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज), अमृता पाटणकर (संपादिका, महाराष्ट्र न्यूज), डॉ. सुनील खर्डीकर (सल्लागार, महाराष्ट्र न्यूज), आनंदा सुर्ले (सल्लागार, महाराष्ट्र न्यूज), प्रवीण बेटकर, त्रिशूल उमाळे, राम सावंत, अविनाश वाकचौरे, भगवान मोरजकर (महाराष्ट्र न्यूज टीम) आणि इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमात इच्छुक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले. यावेळी महिलांसाठी खास ४ लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते. त्यामध्ये चिठ्ठया टाकून ज्या महिलांचे नाव लकी ड्रॉमध्ये निघाले त्यांना अनुक्रमे लंच बॉक्स, टी-सेट आणि कुकर बक्षिस देण्यात आले. या लकी ड्रॉमध्ये पैठणी साडी हे पहिले बक्षिस नीलिमाबाई पाखरे यांना मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगेश जोशी यांनी केले. तसेच आभार देखील मांडले.