दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन…

Published:

mumbai – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच आयटीआयच्या ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ योजनेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. विलंब शुल्कासह अर्ज १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारले जातील.

तर अतिविलंब शुल्कासह अर्ज १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क संकलित करून ते निर्धारित पद्धतीने मंडळाकडे जमा करावे. शुल्क पावत्या व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळांकडे ७ डिसेंबर २०२६ पर्यंत सादर करावयाची आहे.

मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांची माहिती अचूक असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अर्जातील नाव, जन्मतारीख व अन्य तपशील काळजीपूर्वक तपासून विद्यार्थी आणि पालकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्जासोबत छायाचित्र अपलोड करताना निर्धारित निकषांचे पालन करण्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने सर्व संबंधित शाळा, विद्यार्थी आणि पालकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page