pune – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्याअपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला. यामध्ये १० ते १५ वारकऱ्यांना धडक बसली असून, तीन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तर काही वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी जेजुरी मुक्कामी होती. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी सकाळी पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान हा अपघात घडल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


