ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

Published:

thane – ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या म्हणजेच मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

भारतीय हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या सुधारित पूर्वानुमानानुसार, ठाणे जिल्ह्यामध्ये ७ जुलै रोजी जोरदार सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, तसेच अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलली आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रमुखांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा सुट्टीचा आदेश देण्यात आला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page