raigad – रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये एक थार कार ५००फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात थार कारचा अपघात झाला. कार ५०० फूट खोल दरीत कोसळली. मंगळवारी रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या कारमधून एकूण ६ प्रवाशी प्रवास करत होते.

कोकणात गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर आज सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे समजते.
२० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातला. उर्वरित 2 जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.


