new delhi – आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत होणारी भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रद्द व्हावा अशी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय भावनेच्या विरोधात असल्याचे या जनहित याचिकेत म्हणण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सैनिकांनी दिलेल्या बलीदानानंतर पाकिस्ताविरुद्ध सामना खेळणे शहीदांच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. नागरिकांची सुरक्षा, राष्ट्रहीत, हेच आपले प्रथम प्राधान्य असले पाहिजे असे या जनहित याचिकेत सांगण्यात आले होते. हा सामना रविवारी असल्याने याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी खटला सुनावणीसाठी घ्यावा, अशी विनंती कोर्टाला केली.
परंतु याचिकाकर्त्यांनी केलेल्या विनंतीला सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नकार दिला. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रोखण्याचा आमचा कसलाही विचार नाही. हा तर सामना आहे. इतकी घाई कसली आहे? असे म्हणत सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता १४ तारखेला दुबईत भारत पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाणार आहे.


