mumbai – मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या असून, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत मसुदा वाचून दाखवला. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण जिंकलो असं जाहीर करत पुढील एका तासात जीआर काढावा, त्यानंतरच आंदोलन थांबवू असं जाहीर केलं. तसंच आज रात्री ९ पर्यंत मुंबई रिकामी करु असंही म्हण्टलं आहे.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या…
मराठा आणि कुणबी एकच असून या मागणीचा जीआर काढण्यासाठी सरकारला २ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला उपसमितीने मान्यता दिली आहे.
सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी एका महिन्यात केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. या प्रक्रियेत कायदेशीर बाबी तपासल्या जातील. शिवेंद्रराजे भोसले यांनी याची जबाबदारी घेतली असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मागे घेण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना एका आठवड्यात आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल, असे सरकारने सांगितले होते. नोकरीच्या पात्रतेत बदल करून महावितरण आणि MIDC मध्येही नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
५८ लाख नोंदींचे रेकॉर्ड ग्रामपंचायतींमध्ये लावले जाणार आहेत आणि जिल्हास्तरावर जातवैधतेची पडताळणी जलद गतीने होणार आहे.