गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी…

Published:

mumbai – गणेशोत्सवासाठी मुर्तींचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.

तसेच 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.

महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजतापासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यानंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.

हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधीत जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथील करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी आदेशात नमूद आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page