पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ऑगस्टला मिळणार…

Published:

new delhi – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख दूरद्श्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

केंद्रीय मंत्री चौहान यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले. कृषी विज्ञान केंद्रांना तयारीबाबत मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ६००० रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता वितरित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची संधी मिळते. यात केव्हीके यांची महत्त्वाची भूमिका आहे. यंदाही केव्हीके यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी तयारीला सुरुवात करावी. हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याबरोबरच जनजागृती मोहिमेचे माध्यम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम उत्सव आणि मिशनच्या स्वरूपात आयोजित व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

2 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता वितरणाच्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना लाभ आणि कृषी क्षेत्रातील विकास योजनांशी जोडण्याची संधी आहे. कृषी सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती द्यावी. खरीप हंगामाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी करून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्धतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत १९ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ३.६९ लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. २० व्या हप्त्यात ९.७ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २०,५०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page