mumbai – मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत भोंगे हटवले असून, ही संपूर्ण कारवाई कोणताही तणाव निर्माण न होता शांततेत पार पडली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अखेर राज्यातील ३,३६७ धार्मिक स्थळावरील भोंगे हटविण्यात आले आहेत. आता विनापरवानगी लावलेल्या भोंग्यांवरील दंडाची अर्धी रक्कम तक्रारदाराला देण्यात येईल. राज्यात कुठेही पुन्हा विनापरवानगी भोंगा लावल्यास, त्या भागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जंगल परिसरात कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवण्यास बंदी असेल. यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सर्व पोलीस आयुक्तांच्या कार्यालयांतर्गत विशेष भरारी पथके स्थापन केली जाणार असून ते भोंग्यांविरोधात तत्काळ कारवाई करतील. भोंग्यांवर कारवाईसाठी प्रमाणित कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण होवू नये म्हणून ध्वनीप्रदुषणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.