thane – शहापूर तालुक्यातील एका इंग्रजी माध्यमिक शाळेत मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर मधील आर.एस.दमाणी या इंग्रजी शाळेत ३०० च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. ८ तारखेला मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.
मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत त्यांनी विद्यार्थिनींकडे विचारणा केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास शिक्षिकांना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही असं सांगतात त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले. घटनेची माहिती समजताच पालकांनी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला.