mumbai – राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती बाबतचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता डाॅक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचा अहवाल आल्यावर त्रीभाषा सुत्र लागू होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राज्यात मराठी भाषा सक्तीची आहे. हिंदी सक्तीची नाहीये. तिसरी भाषा हिंदी नाही तर इतर कोणतीही भाषा निवडता येईल. या संदर्भात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा केली आणि असा निर्णय घेतला की, त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून भाषा लागू करावी आणि कशा प्रकारे करावी, कुठली करावी, मुलांना कोणता पर्याय द्यावा. या सर्वांचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीतीतल सदस्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येईल. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल.