mumbai – शालेय शिक्षणात हिंदी सक्ती केल्याने याविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र मोर्चा काढणार आहेत, या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत पक्षाकडून पत्रक काढण्यात आले असून, पत्रकात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात जयंतराव पाटील यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, 5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्ये सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले.