pune – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.
दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.