राज्यात साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…

Published:

mumbai – राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर  बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती कपूर यांनी यावेळी दिली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page