mumbai – भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे आता 5.50 टक्के इतका झाला आहे.

रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के पर्यंत आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पत धोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे. या आधी हा दर ४ टक्के राहील असा अंदाज होता.
चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक वृद्धी दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सोन्याचे दागिने गहाण ठेवून अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना आता ७५ ऐवजी ८५ टक्के इतक्या रकमेचं कर्ज मिळेल, असं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं. देशात परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.