dombivali – डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यातील कथित पोलीस भ्रष्टाचाराच्या व्हिडिओची पुनर्प्राप्ती आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बदलापूर येथील नरेश ठक्कर यांनी ठाणे झोन-३ चे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी हि मागणी केली आहे.
या तक्रारीत ठक्कर यांनी जून २०२४ मध्ये फेसबुकवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओबाबत माहिती दिली आहे, ज्यामध्ये डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात आला होता. हा व्हिडिओ लोकप्रिय समाजसेविका व माजी भाजप महिला मोर्चाच्या नेत्या मनीषा राणे यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता आणि सत्यशोधक सतीश वाडेल यांनी तयार केला होता.

या व्हिडिओमध्ये भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सध्या हा व्हिडिओ फेसबुकवरून हटवण्यात आला असून तो गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे यासंदर्भात ठक्कर यांनी तक्रार अर्ज दाखल करून त्यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे…
- फेसबुक किंवा संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुनर्प्राप्त केला जावा.
- व्हिडिओतील आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
- दोषी आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, ठक्कर यांनी तक्रार अर्जात असेही स्पष्ट केले आहे की, पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी या प्रकरणाची पारदर्शक आणि त्वरित चौकशी अत्यंत आवश्यक आहे. तसेच उपायुक्त कार्यालयाने या प्रकरणात फक्त पत्र पुढे पाठवण्याची “पोस्टमन” भूमिका न बजावता, स्वतःचे अधिकार वापरून न्याय व उत्तरदायित्व सुनिश्चित करावे.


