thane – मौजे खारेगाव येथे अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 मे 2025 रोजी रात्री ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह तहसिलदार उमेश पाटील व ठाणे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या एक जेसीबी, एक ट्रक व दोन मोटरसायकल जप्त केल्या. हा सर्व ऐवज जवळपास रु.80 लाखांचा असून या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत बाळकूम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप, सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ससाने, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सचिन सावंत, नितीन अहिरे व महसूल सहाय्यक हर्षवर्धन गंगावणे हे महसूल कर्मचारी सहभागी होते.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, यापुढेही अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी दिला आहे.